
तेहरान , 18 नोव्हेंबर (हिं.स.)।इराणने सर्वसाधारण भारतीय पासपोर्टधारकांना मिळणारी व्हिसा-मुक्त प्रवासाची सुविधा निलंबित केली आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरपासून इराणला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना व्हिसा घेणे अनिवार्य ठरणार आहे. रोजगाराच्या खोट्या आश्वासनांद्वारे किंवा इतर देशांत पुढे पाठविण्याचे दाखले देऊन भारतीयांना फसविण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर इराणने हा निर्णय घेतला आहे.
विदेश मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोजगाराचे आमिष किंवा तिसऱ्या देशात पाठविण्याची हमी देऊन भारतीय नागरिकांना इराणमध्ये ओढून नेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये तर इराणमध्ये पोहोचल्यानंतर लोकांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. आपराधिक घटकांकडून या सुविधेचा गैरवापर थांबविणे हे इराणच्या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, अलीकडच्या काळात अनेक भारतीयांना बनावट नोकरीचे आमिष दाखवून किंवा दुसऱ्या देशात पाठविण्याचे आश्वासन देऊन इराणमध्ये नेण्यात आले. काही एजंट असे सांगत होते की इराणला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, त्यामुळे प्रवास सोपा आहे. पण इराणमध्ये पोहोचल्यावर अनेकांच्या बाबतीत गंभीर फसवणूक झाली. काही भारतीयांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागितली गेली.
या घटनांनंतर इराण सरकारने गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हिसा-मुक्त सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, विदेश मंत्रालयाने भारतीय नागरिकांना कडक इशारा दिला आहे की कोणत्याही एजंटच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्हिसा-फ्री प्रवास, इराणमार्गे इतर देशांत नेण्याचे दावे किंवा नोकरीची ऑफर यांची नीट चौकशी करा आणि फसवणुकीपासून सावध रहा.
इराणच्या या निर्णयानंतर २२ नोव्हेंबरपासून भारतीयांना इराणला जाण्यासाठी व्हिसा आवश्यक असेल. तसेच इराणमार्गे तिसऱ्या देशात जाणाऱ्या प्रवाशांनाही व्हिसा घ्यावा लागेल. व्हिसा-मुक्त प्रवासाची सुविधा आता रद्द करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode