
सोलापूर, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। नवी पेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी चेक चोरून नेला. त्यात फेरफार करून चेकवरील रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात वर्ग करून घेतली. हा प्रकार दोन महिन्यांनी उघड झाला असून या प्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी उत्तम दत्तात्रय जाधव (वय ७१, रा. कासारी, ता. बार्शी) यांनी शेतीपिकातून आलेल्या रकमेचा धनादेश नवी पेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा केला होता. तीन लाख ९४ हजार २६९ रुपयांचा तो धनादेश होता. एका तरुणाने बॅंकेतील शिपायाची दिशाभूल करून तो धनादेश स्वत:कडे घेतला. बॅंकेतील चेक बॉक्समध्ये घेतलेल्या त्या धनादेशावर त्याने फेरफार केला.स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी चेकवरील रक्कम संशयित आरोपीने उत्तराखंडमधील हरिद्वार येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत वर्ग केली. अमर तपेदार (रा. उत्तराखंड) याच्या खात्यात ती रक्कम जमा झाली होती. पण, त्यानेही त्याबद्दल कोणाला काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे उत्तम जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड