
अकोला, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। अकोल्याच्या वाडेगावमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया समोर दिवसाढवळ्या 2 लाख 80 हजार रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. शेख मुद्दसिर शेख असलम कुरेशी यांनी बँक आणि एटीएममधून पैसे काढून ते गाडीवर ठेवताच तोंडाला रुमाल बांधून तीन ते चार युवकांनी त्यांना काही पैसे पडल्याचे सांगत खाली उतरवले. ते खाली उतरल्याबरोबरच चोरट्यांनी गाडीवरील पैशांची पिशवी उचलून पोबारा केला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यादरम्यान, घटनेनंतर वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी संभाजी हिवाळे व बाळापुरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातही वाडेगावात मटन विक्रेत्याच्या दुकानासमोर ठेवलेल्या दुचाकीवरून दोन लाख रुपये चोरीस गेले होते. सलग दोन चोऱ्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे