
जळगाव, 18 नोव्हेंबर (हिं.स.)रावेर तालुक्यातील कुसुंबा येथे पित्याने व्यसनाधीन आणि मालमत्तेवरून वारंवार वाद घालणाऱ्या मुलाचा लाकडी मोगरीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आलीय. सचिन रवींद्र पाटील असं मृत मुलाचं नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रावेरातील कुसुंबा येथील रविंद्र भगवान पाटील यांच्या पहिल्या पत्नीपासून सचिन आणि पूजा अशी दोन मुले असून पत्नीचे निधन झाले आहे. दुसऱ्या पत्नीपासून अभिषेक असे एक अपत्य आहे. मयत सचिन पाटील हा लहानपणापासून मामांकडे सुरत येथे राहत होता आणि अविवाहित होता. अधूनमधून तो कुसुंबा येथे वडिलांकडे येत असे. गेल्या तीन महिन्यांपासून तो गावातच राहत होता. दरम्यान सचिन हा दारूच्या नशेत त्रास देत असल्याने रविंद्र पाटील त्याला शेती वा घरातील हिस्सा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे घरात सतत वादविवाद सुरू असत. सोमवारी रात्रीही सचिन दारूच्या नशेत घरी आला आणि नेहमीप्रमाणे प्रॉपर्टीबाबत बाचाबाची सुरू झाली.वाद चिघळताच रविंद्र पाटील यांनी रागाच्या भरात सचिनला खाली पाडले, दोरीने हातपाय बांधले आणि घरातील लाकडी मोगरीने त्याच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमेमुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर