
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। रियलमीने आपल्या नवीन रियलमी यूआय 7.0 (अँड्रॉइड 16 आधारित) अर्ली अॅक्सेस प्रोग्रामचा विस्तार मिड-रेंज स्मार्टफोन्सपर्यंत केला आहे. उच्च श्रेणीतील मॉडेल्सनंतर आता कंपनीनं चौथ्या टप्प्यात रियलमी P3, रियलमी 14T, रियलमी 14 प्रो आणि रियलमी नार्झो 80 प्रो या लोकप्रिय मिड-रेंज फोन्ससाठी बीटा अपडेट रोलआऊट सुरू केला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी रिअलमी जीटी 7 प्रो सोबत सुरू झालेला हा अपडेट प्रोग्राम आता वेगानं पुढे जात असून पहिल्या तीन टप्प्यांत GT 7, GT 7 Dream Edition, GT 6 आणि GT 6T या फ्लॅगशिप आणि प्रीमियम डिव्हाइसेसना बीटा दिल्यानंतर कंपनीनं आता मध्यम श्रेणीकडं वळण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या अपडेटनुसार Realme P3 सोबत Realme 14T (RMX5078_16.0.0.200(EX01)), Realme 14 Pro (RMX5056_16.0.0.205(SP04EX01)) आणि Realme Narzo 80 Pro (RMX5033_16.0.0.205(SP04EX01)) या मॉडेल्सना बीटा आवृत्ती उपलब्ध होत आहे. हा बीटा पॅकेज साधारण 3 ते 5 GB च्या दरम्यान असल्याने फोनमध्ये पुरेशी स्टोरेज उपलब्ध असणं आणि किमान 40% बॅटरी चार्ज असणं आवश्यक आहे. अपडेटसाठी युजर्सना Settings > About device > Version येथे जाऊन Version number वर सात वेळा टॅप करून Developer mode सुरू करावा लागणार आहे. त्यानंतर About device मध्ये दिसणाऱ्या Realme UI 7.0 बॅनरवर टॅप करुन, वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्समधून Beta program निवडून Early Access साठी अर्ज करता येतो. अर्ज यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांत OTA अपडेट उपलब्ध होणार आहे.
बीटा फेज असल्यामुळे काही बग्स किंवा अॅप्समध्ये अडथळे येण्याची शक्यता असून मुख्य फोनवर वापरणाऱ्यांसाठी स्थिर आवृत्तीची प्रतीक्षा करणंच सुरक्षित ठरेल. मात्र नवीन AI फीचर्स, सुधारित अॅनिमेशन्स आणि स्मूथ 120Hz ऑप्टिमायझेशनचा अनुभव लवकर घ्यायचा असल्यास हा बीटा अपडेट उत्तम संधी ठरू शकतो. रियलमीकडून चौथ्या टप्प्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी अपडेट काही युजर्सना मिळू लागल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध स्लॉट्स मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर अर्ज करण्याचं आवाहन युजर्स समुदायातून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule