
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। दीर्घकाळ प्रलंबित असलेला महापालिकेचा दिव्यांग बांधवांसाठीचा ५ टक्के निधी आता प्रत्यक्षात मार्गी लागणार आहे. भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा प्रश्न सोडवला गेला असून, प्रशासकीय पातळीवर लगेचच हालचाली सुरू झाल्या आहेत.
महापालिकेकडून अनेक महिन्यांपासून हा निधी रोखून ठेवला होता, यामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. परिस्थितीची गंभीरता ओळखून जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी तत्काळ महापालिका आयुक्तांशी संपर्क साधत आवश्यक तो पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने दोन दिवसांतच हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी अधिकृत माहिती दिली.
या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये मोठा दिलासा पसरला आहे. या कामासाठी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यासाठी मराठवाडा विभाग भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे मराठवाडा विभाग प्रमुख सुनील मुलगीर, बाळासाहेब घाटुळ, गिरीश शेटे, रमेश मठपती, कृष्णा काळे, रखमाजी सपाटे, दिलीप सौदागर, सरचिटणीस भालचंद्र गोरे, झोपडपट्टी सेल जिल्हाध्यक्ष महेंद्र धबाले आदींनी शिवाजीराव भरोसे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. उपस्थितांनी दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या पुढाकाराचे जोरदार कौतुक करत, प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य वेळी घेतलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis