
गडचिरोली., 21 नोव्हेंबर (हिं.स.)
माओवादाचा हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या एका दाम्पत्याच्या आयुष्यात आज एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या 'प्रोजेक्ट संजीवनी'च्या मदतीने पुनर्वसन झालेल्या अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश हिचामी आणि त्यांची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी मट्टामी यांना जिल्हा महिला सामान्य रुग्णालयात पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
या दाम्पत्याने १ जानेवारी २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. अर्जुन हा डिव्हीसीएम (राही दलम) तर सम्मी एसीएम (डिके झोन डॉक्टर टीम) म्हणून कार्यरत होती. दलममध्ये असताना त्यांना कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य नव्हते, मात्र आत्मसमर्पणानंतर त्यांना शांततापूर्ण जीवन मिळाले.
गडचिरोली पोलीस दल आत्मसमर्पित माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. 'प्रोजेक्ट संजीवनी' अंतर्गत या दाम्पत्याला आरोग्य सुविधा, रोजगार प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
या दाम्पत्याला मिळालेले लाभ:
आर्थिक सहाय्य: केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी १६.३ लाख रुपये निधी.
ओळखपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, ई-श्रम कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स.
शासनाच्या २००५ पासूनच्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस दलाच्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे २०२५ वर्षात आतापर्यंत एकूण १०१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल, यांनी दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंसक भूतकाळाला मागे सोडून सामान्य जीवन जगू इच्छिणाऱ्या इतर माओवाद्यांना या दाम्पत्याच्या नवजीवनाने नवी उमेद दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond