पालघर - नगराध्यक्षपदासाठी 8, नगरसेवक पदासाठी 134 उमेदवारी अर्ज वैध
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी 8 तर 30 नगरसेवक पदांसाठी 134 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननीदरम्यान एकूण 39 उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. मंगळवारी सकाळपासून सु
पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 134 उमेदवारी अर्ज वैध


पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

पालघर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी 8 तर 30 नगरसेवक पदांसाठी 134 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननीदरम्यान एकूण 39 उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.

या निवडणुकीत बंडखोरीचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. शिंदे सेनेचे प्रवक्ते केदार काळे आणि भाजपच्या ओबीसी सेलचे प्रशांत पाटील यांनी बंडखोरी करत स्वतंत्र उमेदवारी दाखल केल्याने राजकीय समीकरणांवर तर्क–वितर्क सुरू आहेत.

छाननीदरम्यान अनेक उमेदवारांवर हरकती दाखल झाल्या होत्या. भाजपचे उमेदवार मुनाफ मेमन यांच्या विरोधात सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाच्या आरोपावरून हरकत दाखल झाली होती. प्रभाग क्र. 1 मधील शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र म्हात्रे यांच्या विरुद्ध मालमत्ता कर थकबाकीची हरकत ठाकरे गटाचे उमेदवार आरिफ कालाडिया यांनी घेतली. प्रभाग 7 मधील शिंदे गटाच्या ज्योती जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या श्रष्टि काटेला यांनी हरकत नोंदवली होती.

नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे उत्तम घरत, भाजपचे कैलास म्हात्रे, ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, तर काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रभात राऊत यांसह विविध पक्षांचे दिग्गज रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग 6 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार ललित जैन यांच्या विरोधातही मालमत्ता कर थकबाकीची हरकत घेण्यात आली होती. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक रविंद्र (बंड्या) म्हात्रे, सुभाष पाटील तसेच भाजपचे मुनाफ मेमन यांच्या अर्जांवर दाखल झालेल्या हरकती अखेरीस रात्री उशिरा फेटाळण्यात आल्या. हरकतीवरील निर्णयास विलंब झाल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची दिवसभर धाकधूक सुरू होती.

आता सर्व वैध उमेदवारांची नावे जाहीर झाल्याने पालघरमध्ये निवडणूक वातावरण आणखी रंगू लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande