
रायगड, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या सकल मराठा परिवार तर्फे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे मोठे उदाहरण घातले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. रक्तदात्यांच्या सहभागामुळे शिबिर उत्साहात पार पडले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र वितरित करून गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेमध्ये सकल मराठा परिवार रायगड समन्वयक सौ. रूपाताई सुखदरे तसेच श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी श्री. शैलेंद्र ठाकूर, श्री. संतोष यवतकर, सौ. उज्ज्वला यवतकर, श्री. राजेश चव्हाण, डॉ. निलेश चव्हाण, श्री. राजू गोरुले, श्री. अक्षय पवार, कु. रंजिता चव्हाण, सौ. ऐश्वर्या कोसबे, श्री. संतोष सापते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
याशिवाय, ‘शब्दाचा हाकेला धावून’ मदत करणारे श्री. प्रीतम श्रीवर्धनकर, श्री. काशिनाथ गुरव आणि श्री. आशिष कदम यांच्या सहकार्यामुळे शिबिर अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. या प्रसंगी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे प्रतिनिधी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. सकल मराठा परिवाराचे सर्व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘आपल्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाचं आयुष्य फुलू शकतं’ या संदेशातून प्रेरित या उपक्रमात सर्व धर्म-समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचा सुंदर संदेश दिला. सकल मराठा परिवाराकडून सर्व रक्तदात्यांचे तसेच आयोजनात मदत करणाऱ्या प्रत्येक बांधवाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. हा उपक्रम पुढील काळातही अशाच सामाजिक कार्यांना चालना देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके