
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील कपासे गावातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि दुरावस्थेला आलेला मुख्य रस्ता अखेर डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे ही कायमची समस्या बनली होती. परंतु सातत्याने पाठपुरावा आणि प्रशासनाकडे होत असलेल्या मागणीनंतर अखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
नवीन रस्ता गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून दैनंदिन प्रवास, विद्यार्थी, शेतकरी तसेच आपत्कालीन सेवांसाठी हा रस्ता सुकर झाला आहे. रस्ता पूर्ण झाल्याने गावात सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
बुधवारी नव्याने तयार झालेल्या या रस्त्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख अनुप पाटील, कपासे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच, माजी उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक मालिनी भाऊराव पाटील, तसेच गावाच्या सर्व गरजांसाठी पुढाकार घेणारे हरीश पाटील यांच्यासोबत रितेश पाटील, महेश वर्तक इत्यादी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अनुप पाटील यांनी गावाच्या विकासासाठी रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. गावकऱ्यांनीही अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याचा आनंद व्यक्त केला आणि पुढील काळातही गावाच्या इतर विकासकामांसाठी प्रशासनाने लक्ष दयावे असे आवाहन केले.
कपासे गावातील रस्त्याची अनेक वर्षांची अडचण दूर झाल्याने आता गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वासही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL