
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणीचे कृषिभूषण कांतराव झरीकर यांच्या मातीशी निष्ठा राखणाऱ्या कामाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून नागपूर येथे त्यांची विशेष सदिच्छा भेट घडून आली.
झरीकर यांचे ‘कांतायण’ या पुस्तकातून त्यांच्या कार्याची माहिती गडकरी यांच्या वाचनात आल्यानंतर आणि डॉ. सुशील शिंदे यांनी त्यांच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिल्यानंतर गडकरी यांनी स्वतः झरीकर यांना भेटीचे निमंत्रण दिले. यानुसार कृषिभूषण झरीकर यांनी नागपूर येथे नितीन गडकरी यांची भेट घेतली. या वेळी गडकरी यांनी झरीकर यांच्या जलसंधारण, फळबाग विकास, सेंद्रिय शेती, जांभूळ बेट संवर्धन, तसेच 'एक गाव – एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी' या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी स्वतः केलेल्या जलसंधारण कामाची माहिती देखील झरीकर यांच्यासमोर मांडली. भेटीत परस्पर सन्मानाचाही मनमोहक क्षण घडला. झरीकर यांनी गडकरी यांना जांभूळ बेटाची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले, तर गडकरी यांनी जलसंधारण कार्यावर आधारित आपले पुस्तक झरीकर यांना भेट म्हणून दिले. पुढील काळातही भेटत राहू, अशी सदिच्छा दोघांनी व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. सुशील शिंदे, डॉ. गिरीश चरडे, डॉ. लोकेश बेरबंशी आदी मान्यवर उपस्थित होते. परभणीच्या भूमिपुत्राच्या कार्याची केंद्र पातळीवर घेतलेली दखल ही संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis