
रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : नगर परिषद निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. सावंत यांनी स्वतःच आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री. सावंत यांची कन्या शिवानी माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या सूनबाई असून, शिवानी यांना उबाठा पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आपल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये, या नैतिकतेच्या भूमिकेतून काही दिवसांपूर्वी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; मात्र आपण भाजपमध्येच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंत तो राजीनामा मंजूर झाला नव्हता, असेही सावंत यांनी सांगितले. मात्र काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर असताना, इथून पुढे सावंत भाजपमध्ये नसतील, असे सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली.
आता पक्षात नसलो, तरी चव्हाण यांच्याबद्दल आदरच आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आता पक्षाचे बंधन नसल्यामुळे मुलीच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मी सोबत असायला हवे, अशी मुलीची इच्छा होती; मात्र मी गेलो नव्हतो. आता मात्र पक्षातच नसल्यामुळे आपल्याला कोणतेही बंधन नाही, असे सावंत म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी