
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोनपेठ तालुक्यातील मौजे करम येथे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सालासर जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे याचा शुभारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्र सुरू झाल्याने परिसरातील हजारो कापूस उत्पादकांना योग्य भाव, पारदर्शक खरेदी प्रक्रिया आणि वेळेवर सेवांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभावाने खरेदीची सुविधा मिळावी आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले असल्याचे उद्घाटनप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
आ. विटेकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय्य मूल्य मिळणे ही काळाची गरज असून सीसीआय खरेदी केंद्रामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा आधार मिळेल.”
कार्यक्रमास जि.प. माजी सभापती विठ्ठलराव सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव जाधव, प.स. माजी सभापती मदनराव विटेकर, श्रीकांत मोरे, रामेश्वर मोकशे, जगदीशजी सारडा, मार्केट कमेटी सचिव दत्तात्रय भोसले, हारून सय्यद, बळीराम भोसले, वेदांत सारडा, शाम मुंदडा, रामेश्वर सारडा यांच्यासह मार्केट कमेटीचे संचालक, कर्मचारी, स्थानिक सरपंच–उपसरपंच आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. स्थापित केलेले हे खरेदी केंद्र आगामी काळात परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी चालना देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis