
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) ई- क्लस्टर पुनर्विकासाबरोबरच मुंबई आणि मुंबई उपनगरांत सर्व प्रकारच्या पुनर्विकास प्रकल्पातील ६०० स्क्वे. फुटापर्यंतच्या सदनिकांना लागणारे मुद्रांक शुल्क माफ करावे, शासनाने काढलेल्या परिपत्रकात आवश्यक सुधारणा करावी, अशी मागणी समूह/ स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात स्वयं पुनर्विकासाबाबत महसूल विभागाच्या जमिनीवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आ. प्रवीण दरेकर यांच्या मागणीवरून मुंबईतील सर्व आमदार, खासदार यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी भाडेकरू इमारतीतील घरे पुनर्विकसित झाल्यानंतर मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ४०० स्क्वे. फुटापर्यंत मुद्रांक शुल्क माफ आहे. मुंबईत झपाट्याने पुनर्विकास सुरु असून ६००-६५० स्क्वे. फुटापर्यंत घरे सर्वसामान्य, मध्यम वर्गीयांना मिळत आहेत. त्यामुळे ही शुल्क माफी ६०० स्क्वे. फुटापर्यंत करावी, अशी मागणी केली होती. दरेकर यांच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६०० स्क्वे. फुटापर्यंतच्या सदनिकांना लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्याचे परिपत्रकही शासनाने आज काढले. तथापि, क्लस्टर रिडेव्हलपमेंटसाठी या परिपत्रकाचा फायदा मिळणार, हे लक्षात घेऊन सर्व रिडेव्हलपमेंटला हा नियम लागू करावा, अशी मागणी दरेकर यांनी पत्राद्वारे शासनाला केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी