परभणी- भाजप जिल्हाध्यक्षांच्या उचलबांगडीची मागणी
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.) पाथरी नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्षपदासह अन्य सदस्यपदाकरीता इच्छुक असणार्‍या उमेदवारांना अंतीम मुदतीतसुध्दा पक्षाचा एबी फॉर्म वितरित न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची पक्षश्रेष्ठ
जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी


परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.) पाथरी नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्षपदासह अन्य सदस्यपदाकरीता इच्छुक असणार्‍या उमेदवारांना अंतीम मुदतीतसुध्दा पक्षाचा एबी फॉर्म वितरित न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची पक्षश्रेष्ठींनी तातडीने उचलबांगडी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेते मंडळींनी गुरुवारी पाथरी एका पत्रकार परिषदेतून केली.

नगराध्यक्षासह सदस्य पदाकरीता पक्षाचे इच्छुक उमेदवार हे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील, अशी घोषणाही या नेतेमंडळींनी केली.

या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुध्दा घेतल्या. पाथरीतील नगराध्यक्षपदासाठी पाच इच्छुकांनी व सदस्य पदाकरीता 50 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जिल्ह्यातील नेतेमंडळी यातून यथायोग्य असे उमेदवार निवडतील व एबी फॉर्म सुपूर्त करतील, हे अपेक्षित होते. परंतु, जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत या इच्छुकांना एबी फॉर्म उपलब्ध केलाच नाही. या प्रकाराने स्थानिक नेते व इच्छुक हे कमालीचे संतापले. जेव्हा जिल्ह्यातील काही नेतेमंडळी व जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी स्थानिक पातळीवर कुठल्याही नेतेमंडळींसह इच्छुकांना विश्‍वासात न घेता नगराध्यक्षासह सदस्यांच्या सर्व जागा शिवसेनेस सोडावयाचा परस्परच निर्णय घेतला. पडद्याआडील, अंधारातील त्या तहाचा स्थानिक मंडळींना थांगपत्तासुध्दा लागला नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यात प्रचंड अशी नाराजी आहे, संताप आहे. एका रात्रीतूनच घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळेच शहरात तब्बल 16 हजार हिंदु समाजबांधव भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षासह सदस्यपदाकरीता उमेदवार नसल्यामुळे कमालीचे भडकले आहेत, सैरभैर झाले आहेत. मुस्लिम समाजातील उमेदवारांच्या पारड्यात मत टाकतांना पक्षाच्या मतदारांवर वेळ येऊन ठेपली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया या संतप्त नेतेमंडळींनी व्यक्त केली व या निवडणूकीत पक्षाकडून इच्छुक असणारे सारे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील, असे या नेतेमंडळींनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पूर्णा नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष प्रशांत कापसे यांनी आपल्या मातोश्रींसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु, त्यांना उमेदवारी बहाल करण्याऐवजी या पक्षातील श्रेष्ठींनी ऐनवेळी शिंदे गटास जागा सोडून दिली. याच शिंदे गटाने कापसे यांना उमेदवारी बहाल केली, असेही या नाराज नेतेमंडळींनी या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. जिंतूरातसुध्दा राजेश वट्टमवार सारख्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यास स्थानिक पातळीवरील श्रेष्ठींच्या प्रखर विरोधामुळे शिवसेनेचे मशाल चिन्ह हातात घेऊन पक्षाविरोधातच बंड पुकारावे लागले, अशी खंतही या नेतेमंडळींनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande