
नंदुरबार, 20 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकांची एमएच-39-एएस (MH-39-AS) ही नवीन मालिकालवकरच सुरु करण्यात येणार असून ज्यांना आकर्षक अथवा उडते क्रमांक पाहिजे असल्यास, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन 24 नाव्हेंबर, 2025 पर्यंत सादर करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी कळविले आहे.
नवीन मालिकेतील क्रमांकांची श्रेणी 0001 ते 9999 पर्यंत असेल. ज्या वाहन धारकांना आकर्षक (Attractive)क्रमांक हवे आहेत त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास 24 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. अर्जासोबत क्रमांकासाठी
आवश्यक शुल्काचा एक धनादेश स्वतःच्या स्वाक्षरीने सीलबंद पाकीटात सादर करावा.
जुनी मालिका संपुष्टात आल्यानंतरच नवीन मालिका सुरु करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज एकाच क्रमांकासाठी प्राप्त झाल्यास विहित शुल्काव्यतिरिक्त जास्त रकमेचा धनादेश सीलबंद पाकीटात सादर करावा. ज्या व्यक्तीचा धनादेश जास्त रकमेचा असेल, त्या व्यक्तीस तो क्रमांक बहाल करण्यात येईल. मुदतीनंतरआलेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही. नवीन मालिकेकरिता प्रथम दुचाकी यांना प्राधान्य राहिल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर