
जळगाव , 20 नोव्हेंबर (हिं.स.) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापलं असून याच दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदारांनी कुटुंबातील सदस्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. यामुळे कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा “सतरंज्या उचलण्याची” वेळ आल्याची खंत व्यक्त होत असून, पक्षातील घराणेशाहीवर जिल्ह्यातील विरोधकांनी निशाणा साधला आहे.अशातच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपसह महायुतीच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांवर सडकून टीका केली. भाजप ही गांडूळाची ××× झाली आहे, अशी टीका माजी खासदार पाटील यांनी केली. राजकारण करायचे असेल तर मैदानात या असे आव्हान देत आगामी निवडणूकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी टिका माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.
घराणेशाहीला विरोध करणारे भाजपचे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला पुढे केल्याने प्रामाणिक कार्यकर्ता भरडला गेला आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून आपण राजकारणात यापूर्वी काम केले असले, तरी भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच खासदारकीचा राजीनामा देत नंतर ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपने २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेच नाही. भाजपला दुप्पट आमदार आणि दुप्पट खासदार कसे करता येतील, यातच रस आहे. त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण नाही.
घराणेशाहीला विरोध करण्याची भाषा भाजप करत होती. मात्र, आज मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. एकेकाळी भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हटला जात असे. मात्र, आता आमदारांसह खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबियांचा झाला आहे, असा आरोप माजी खासदार पाटील यांनी केला.
वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नवीन लोकांना संधी देण्याचे धोरण सध्या भाजपकडून अवलंबण्यात आसे आहे. पूर्वी भाजपमध्ये बदलाची भूमिका होती, आता बदला घेण्याची भूमिका आहे. अर्थात, त्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यांच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही, असेही माजी खासदार पाटील म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर