
नागपूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक मानल्या जाणाऱ्या दिल्लीत झालेल्या भेटींचा धागा पकडत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भाजप-शिंदे-फडणवीस आघाडीवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनीही अलीकडच्या दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, राज्यातील निर्णयप्रक्रियेवर दिल्लीतील नेतृत्वाचा प्रभाव वाढल्याचा आरोप सपकाळ यांनी नागपूरमध्ये केला.
सपकाळ म्हणाले की , भाजपा-महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून राज्यातील बहुतांश निर्णय अमित शाहच घेतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मोठ्या–छोट्या कुरकुरीबाबत दिल्लीत जाऊन कळवावे लागते. अजित पवार यांच्या भेटीनंतर पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मिळालेल्या क्लिन चिटचा उल्लेख करत सपकाळ यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असून त्यातून वारंवार दिल्लीला धाव घ्यावी लागते’ असा आरोप केला.
राहुल गांधींच्या ‘मतचोरी’ आरोपांना पाठिंबा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यालाही सपकाळ यांनी स्पर्श केला.
“भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत आहे, हे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहे. हा केवळ काँग्रेसचा मुद्दा नाही, तर संपूर्ण देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.‘गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है’ हे घोषवाक्य लोकांमध्ये का पसरत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आघाड्या स्थानिक पातळीवर ठरतील
मनसेसोबत युतीबाबत विचारले असता, सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “मुंबई वा राज्यस्तरावर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.”
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असून त्याचा आदर पक्षाने करावा, असेही त्यांनी नमूद केले. इंडि आघाडीबाहेरील कोणताही पक्ष युतीत येऊ इच्छित असेल, तर प्रस्ताव राष्ट्रीय पातळीवर विचारात घेतला जाईल, असे सपकाळ यांनी सांगितले. तसेच, “शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे; त्यांनी कोणाशी युती करावी हा त्यांचा विषय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी