
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।सूर्योदयाच्या आधीच शहरातील सात बड्या व्यक्तींची घरे, दुकाने अन् व्यावसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या. त्यात सराफ व्यापारी आपटे, त्यांचे व्यावसायिक भागिदार वेणेगुरकर आणि कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायणपेठकर, ॲड. उमेश मराठे यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.चुकविलेल्या टॅक्सवर २०० टक्के दंड, व्याज लावून टॅक्सची मूळ रक्कम वसूल केली जाते. या पार्श्वभूमीवर संबंधितांचे व्यवहार तपासण्यासाठी सोलापुरात आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत सॉफ्टवेअर, आयटी इंजिनिअरही होते. धाडीनंतर या बड्या व्यक्तींनी त्यांच्या ‘सीए’ला बोलावले. पण, आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना तेथे येऊ दिले नाही. संबंधितांचे जबाब, व्यवहाराची चौकशी झाल्यावर अधिकाऱ्यांनी ‘सीए’शी संवाद साधला. धाडीवेळी हिशेबाच्या गोपनीय डायरी, कागदपत्रे देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. टॅक्स चोरीची रक्कम मोठी असल्याने उद्याही (गुरुवारी) पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड