
जळगाव , 20 नोव्हेंबर, (हिं.स.) - उत्तरेकडील शीत वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरल्याने गारठा वाढला आहे. जळगाव जिल्हा देखील काही दिवसापासून गारठला आहे. खान्देशातील धुळे येथे राज्यातील सर्वाधिक कमी ६.१ अंशांची नोंद झाली. तर जळगावला ८.१ तापमानाची नोंद झाली.
दरम्यान आज राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून दोन दिवसापूर्वी ७ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी वाढून ८.१ वर पोहोचला. पहाटे जाणवणारी हुडहुडी दुपारी कमी होत असली तरी, सायंकाळ होताच थंडीचा पुन्हा कडाका वाढत आहे. आता उत्तरेत बर्फदृष्टी बऱ्याच प्रमाणात थांबलेली आहे. त्यामुळे शीतलहरींची निर्मिती हळूहळू घटत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत गारठा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर-पश्चिमी वाऱ्यांमुळे थंडी वाढली होती; मात्र हे वारे कमकुवत होणार असून, दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण, कोरड्या हवेचा प्रभाव वाढत आहे. हे हवेच्या दाब प्रणालींमधील बदलांमुळे घडत आहे. ज्यामुळे थंड हवेचा प्रवाह मंदावतो. असे तज्ञांनी मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर