
सोलापूर, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात मागील दहा महिन्यांपासून १७ हजार जन्म-मृत्यू दाखले विविध कारणास्तव प्रलंबित होते. ऑनलाइन प्रणाली असूनही दाखल्यांच्या मंजुरीसाठी विलंब होत होता. आयुक्तांचा पक्षपाती कारभार अन् अधिकाऱ्यांमधील नाराजी याचा थेट परिणाम कामावर झाल्यामुळे नागरिकांची अडचण होत होती. आरोग्य विभागाने कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करत कामात गती आणली आणि अवघ्या १५ दिवसांत १७ हजार प्रलंबित दाखल्यांचा विषय मार्गी लावला आहे.
ग्रामीण भागातील नागरिक शहरी दवाखान्यात दाखल होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नवजात बाळाची नोंद दाखला महापालिकेत मिळतो. त्यामुळे नवजात बालकाचे नाव लावणे, नावात दुरुस्ती, जुने दाखले यासह आधार-पॅन कार्ड, शैक्षणिक कामांसाठी, कुटुंब नोंद, वारसा आणि विमा दाव्यासाठी तसेच शासकीय कामांसाठी जन्म-मृत्यू दाखला आवश्यक असतो. परंतु, प्रलंबित दाखल्यांमुळे अनेकदा महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होतो. गेल्या दहा महिन्यांत महापालिकेकडे ८० हजार दाखल्यांचे अर्ज होते. त्यापैकी १७ हजार अर्ज प्रलंबित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड