भाषा ही आपली अर्जित संपत्ती – कुलगुरू कुमुद शर्मा
रिद्धपूर येथे महानुभावी ‘सकळ लिपी’ कार्यशाळेचे उद्घाटन रिद्धपूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : “भाषा ही आपली मिळवलेली संपत्ती आहे. ती आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ असल्यानेच ती आपला स्वाभिमान बनते,” असे प्रतिपादन वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंद
रिद्धपूर येथे महानुभावी ‘सकळ लिपी’ कार्यशाळेचे उद्घाटन


रिद्धपूर येथे महानुभावी ‘सकळ लिपी’ कार्यशाळेचे उद्घाटन

रिद्धपूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : “भाषा ही आपली मिळवलेली संपत्ती आहे. ती आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ असल्यानेच ती आपला स्वाभिमान बनते,” असे प्रतिपादन वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी व्यक्त केले. रिद्धपूरच्या भूमीवरील श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव संप्रदायाच्या कार्याचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, या संप्रदायाने मराठी भाषा व संस्कृतीच्या जपणुकीची दीर्घ परंपरा सिद्ध केली असून तो आपल्यासाठी अभिमानाचा वारसा आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा आणि तत्त्वज्ञान अभ्यास केंद्र, रिद्धपूर येथे आयोजित ‘महानुभावी सांकेतिक सकळ लिपी’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचा शुभारंभ त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अविनाश अवलगावकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना ‘सकळ लिपी’चा उगम, अर्थ आणि महानुभाव तत्त्वज्ञानाशी असलेली सांगड स्पष्ट केली. अखिल भारतीय महानुभावी परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य परमपूज्य श्री करंजेकर बाबा यांनी आठशे वर्षे पूर्वीची ही लिपी संतांनी जिवंत ठेवली आणि आता समाज तिचा अभ्यास करीत असल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांनी श्री चक्रधर स्वामींनी लोणार सरोवराच्या निर्मितीचा केलेला पूर्वसंकेतही अधोरेखित केला.विशेष पाहुणे म्हणून उपस्थित विद्यापीठाचे निवासी लेखक डॉ. भूषण भावे यांनी रिद्धपूरच्या पवित्र भूमीतील उपस्थितीला आपले सौभाग्य म्हटले. कार्यवाहक कुलसचिव कादर नवाज खान यांनी केंद्राच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला, तर डॉ. जयंत उपाध्याय यांनी महानुभाव पंथाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला.कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आकाश गजभिये यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कुलगुरू प्रा. शर्मा यांच्या हस्ते गौरव झाला. तसेच विषयतज्ज्ञ श्री चक्रधर कोठी व विशाल हिवरखेडकर यांचा सन्मानही करण्यात आला.

या निमित्ताने प्रकाशित ग्रंथ

‘श्री गोपीराज ग्रंथसंग्रहालय : हस्तलिखित साहित्याची ग्रंथसूची’ (लेखक : विशाल हिवरखेडकर)

‘कर्मयोगी गाडगेबाबा : एक युग प्रवर्तक’ (अनुवाद : डॉ. अनवर अहमद सिद्दीकी)

सकल लिपीवरील भित्तीपत्रक

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे स्वागत व परिचय प्रभारी प्राध्यापक आणि समन्वयक डॉ. नीता मेश्राम यांनी केला. संचालन डॉ. स्वप्नील मून यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन रामटेके यांनी केले. सत्रास विविध विभागांतील प्राध्यापक, महंत, स्थानिक कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यशाळेचा समारोप 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार असून या सत्राचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रवर महंत नागराज बाबा (महंत श्री गोपीराज बाबा) असतील. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. नीता मेश्राम आणि विषयतज्ज्ञ श्री चक्रधर कोठी व विशाल हिवरखेडकर उपस्थित राहणार आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande