
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील मनोज भाटवडेकर यांच्यासह कराडमधील रविराज जाधव यांनी कराड ते सोलापूर असा सलग ३९ तास ६०० किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. दुखापतीवर मात करत या दोघांनी ऑडेक्स क्लब पॅरेशियनकडून (पॅरिस) दिला जाणारा सुपर रॅन्डोनिअर हा किताब मिळविला आहे.
दिवसेंदिवस मानवी आरोग्याचा गंभीर होत चाललेला प्रश्न, वाढते प्रदुषण अन् लांब पल्ल्याच्या सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सायकलिंग क्लब सायकल वापराला उत्तेजन देतात. चिपळूण सायकलिंग क्लबचे मनोज भाटवडेकर त्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांनी स्वतः गेल्या चार वर्षांत सलगपणे पाचव्यांदा हा किताब पटकाविला असून कोकणातील ते पहिलेच सायकलिस्ट बनले आहेत.
वाहनांच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्याचबरोबर व्यायामाकडे दुर्लक्ष करत चंगळवादी संस्कृतीमुळे मानवी आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लांब पल्ल्याचे पण कोणाचीही मदत न घेता एका वर्षात २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटर बीआरएम असे एकूण १५०० किलोमीटर सायकलिंग निर्धारित वेळेत पूर्ण करणार्या सायकलिस्टला सुपर रॅन्डोनिअर हा किताब दिला जातो. जगभरात ऑडेक्स क्लब पॅरेशियनशी संलग्न सदस्य असणार्या सायकल क्लबकडून बीआरएम आयोजित केल्या जातात. चिपळूण येथील सह्याद्री रॅन्डोनिअर्स हा क्लब त्यापैकीच एक असून या क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यातील सुमारे ७० हून अधिक सायकलिस्टनी एसआर (सुपर रॅन्डोनिअर) होण्याचा मान मिळविला आहे. याच सह्याद्री रॅन्डोनिअर्सचे संस्थापक आणि चिपळूण सायकल क्लबचे उपाध्यक्ष मनोज भाटवडेकर यांनी रविराज जाधव यांच्यासोबत कराडमधील शिवतीर्थ परिसरातून ६०० किलोमीटर बीआरएमला प्रारंभ केला. कराड, सातारा, लोणंद, फलटण - नातेपुते - पंढरपूर ते सोलापूर आणि तेथून रिटर्न असे हे अंतर होते. मात्र कराडमधून बीआरएमला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ७० किलोमीटरमध्ये मनोज भाटवडेकर यांच्या पायाच्या जुन्या दुखापतीने डोके वर काढले होते. मात्र त्यानंतरही रविराज जाधव यांच्यासोबत त्यांनी सलग दोन दिवस भर उन्हात आणि शनिवारची पूर्ण रात्र असे सलग ३९ तास ४२ मिनिटे सायकलिंग करत ६०० किलोमीटर अंतर पार केले आहे.
जिद्द आणि दुखापतींवर मात करत भाटवडेकर यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. सह्याद्री
रॅन्डोनिअर्स आणि चिपळूण सायकल क्लबचे सदस्य यांच्या सहकार्य आणि पाठिंबामुळेच हे यश मिळवणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मनोज भाटवडेकर यांनी व्यक्त केली आहे.
सन २०२१ साली मनोज भाटवडेकर यांनी पहिल्यांदा सुपर रॅन्डोनिअर हा किताब पटकाविला होता. त्यानंतर सन २०२२ -२०२३ साली दुसर्यांदा त्यांनी हा किताब पटकाविला आहे. त्यानंतरच्या दोन वर्षांत दोनवेळा त्यांनी हा किताब पटकाविला होता. यावर्षी नोव्हेंबरपूर्वी त्यांनी २००, ३०० आणि ४०० किलोमीटर बीआरएम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळेच आता ६०० किलोमीटर अंतर यशस्वीपणे पार करत त्यांनी पाचव्यांदा एसआर हा बहुमान मिळविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी