
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता संपल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक करून ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची एक संधी द्यावी,असा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेत झाला. याला पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या नियमावली संदर्भात अंतिम परिपत्रक प्रसिद्ध केले नाही.
पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांचा निर्णय २५ नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विद्यापीठाच्या या निर्णयाअंतर्गत समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहेत. या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सत्रपूर्तता, शेवटचे वर्ष त्यांच्या मूळ महाविद्यालयातून पूर्ण करण्याची आवश्यकता, विविध अभ्यासक्रमात वेळोवेळी समाविष्ट झालेला मूळ कालावधी या सर्वांची छाननीही होणार आहे.
याबाबतची प्रणालीही तयार करण्याचे काम सुरू आहे. सत्रपूर्तता किंवा पीआरएन संदर्भातील सर्व माहिती ही केवळ विद्यापीठाकडे असलेल्या स्वतःच्या डेटाबेसमधूनच घेतली जाणार असून यासाठी विद्यापीठाने कोणत्याही व्यक्तीला, व्यक्तीसमूहांना नियुक्त केले नाही. पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील कार्यप्रणाली स्पष्ट करणारे परिपत्रकही यथावकाश जाहीर केले जाणार आहे, असे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु