
गडचिरोली, 20 नोव्हेंबर, (हिं.स.) - गडचिरोली जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा धोका पुन्हा एकदा सिद्ध झाला असून, देऊळगाव बुट्टी (ता. आरमोरी) येथे वेगवेगळ्या दिवशी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोन वृद्ध महिलांना वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे मुक्ताबाई नेवारे (वय, ७०) आणि अनुसया जिंदर वाघ (वय, ७०) अशी आहेत. मुक्ताबाई नेवारे बुधवारी सकाळी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, जिथे वाघाने त्यांना ठार केले. अनुसया जिंदर वाघ १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृत प्राण्यांचा उग्रवास येत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिकांनी शोधमोहीम राबवली असता, रात्री ८ वाजेच्या सुमारास अनुसया जिंदर वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. तसेच, याच परिसरात मुक्ताबाई नेवारे यांचाही मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती देऊळगावचे पोलिस पाटील मिथून कांदोळ यांनी आरमोरी पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी पंचनामा केला. दोन वृद्ध महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond