
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। सेवाभावी सामाजिक संस्थेकडून चालविण्यात येत असलेल्या अपंग शाळेच्या मान्यतेचे नूतनीकरण न करणे चांगलेच महागात पडले आहे. राज्य दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांनी जिल्ह्यातील १७ विनाअनुदानित तर एका अनुदानित अपंग शाळांची मान्यता रद्द केली आहे. या कारवाईमुळे शाळा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.
राज्य दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग मुलांकरिता सेवाभावी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या शाळांना अनुदान देण्यात येते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील १८ शाळांनी विहित मुदतीत शाळा मान्यतेचे नूतनीकरण न केल्याने या शाळा आता अनोंदणीकृत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांना आता शासकीय अनुदान मिळणे बंद होणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड