
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावे म्हणून प्रयत्न केला परंतु अवघ्या 2 मार्काने माझी डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहिली पण वडीलांच्या इच्छेने मी वकील झालो. असे सांगून विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्वल निकम यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. घरात वडील बॅरिस्टर होते म्हणून वडीलांची इच्छा होती की मी वकील व्हावे पण माझी इच्छा नव्हती. सहकाराच्या एका खटल्याने वकीलीची सुरूवात झाली. जळगांव येथील खटल्यातून मला मुंबई बॉम्बस्फोटात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जळगांव ते मुंबई असा प्रवास करत असताना अनेक संवेदनशील आणि महत्वाच्या खटल्यात सरकारची बाजू मांडून गुन्हेगारांना शिक्षे पर्यत पोहोचवण्यात यश आले. त्यातच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका आंतरराष्ट्रीयस्तरावर मांडता आली. माझी भावना नेहमी माझा देश प्रथम अशीच आहे म्हणूनच दहशतवादी कसाबला फाशी पर्यत आणि पाकीस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यापर्यत यश मिळाले. संजय दत्त आणि 93 चा बॉम्बस्फोट या प्रश्नावर ते म्हणाले संजय दत्त याने जर आधीच सुरक्षा यंत्रणांना सांगितले असते तर बॉम्बस्फोट झाले नसते. नेता असो की अभिनेता खोटी गांधीगीरी पांघरून पाप धुता येत नाही. आंतकवादाला कोणताच धर्म नसतो असेही ते म्हणाले. कसाब आणि बिर्याणी हे केवळ एक वकीली युक्तीवाद होता. मिडिया ट्रायलचा न्यायाधीशावर परिणाम होत नाही असे माझे मत आहे. तरूण वकीलांनी कायद्याचा अभ्यास चांगला करावा, नेहमी सत्य सांगावे, कायद्याचे संरक्षण करावे असा सल्लाही त्यांनी एका प्रश्नावर दिला. निरपेक्ष आणि निधर्मी भावनेतूनच खरा न्याय मिळतो. निवडणुकीला उभा राहणे ही चूक का या प्रश्नावर ते म्हणाले. अवघ्या 10 दिवसापुर्वी निवडणुकीला उभे राहण्यासाठी सांगण्यात आले त्यामुळे तयारी नव्हती तरीही निवडणूक लढवली जर माझा मतदारसंघ तुरूंग असता तर मी इतर कोणालाही पराभूत केलो असतो असे ते गंमतीने म्हणाले. मी स्वतःला डॉन समजतो मी बलवान आहे. अनेक गुन्हेगार मला घाबरतात असेही ते म्हणाले. कुटुंबाला वेळ देता का या प्रश्नावर ते म्हणाले माझा देशच माझे कुटुंब आहे. जळगांव पासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास मुंबई आणि आता राज्यसभेचा खासदार असा यशस्वीपणे सुरू आहे यामध्ये मी समाधानी आहे असेही ते म्हणाले. तब्बल दीड तास सुरू असलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये माधव देशपांडे यांनी अनेक महत्वाचे प्रश्न विचारत निकम यांना बोलते केले. पद्मश्री अॅड उज्वल निकम यांनीही दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड