
परभणी, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। वेध फाउंडेशनतर्फे तरुणांच्या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि प्रेरणादायी व्यक्तींना जवळून जाणून घेता यावे, यासाठी ‘परभणी टॉक्स – मुलखा वेगळी माणसं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४ दरम्यान हा उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे.
या मंचावर आपल्या क्षेत्रात विलक्षण कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांची जडणघडण, संघर्ष आणि यशस्वी प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांतून ऐकण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या सूत्रधार म्हणून प्रसिद्ध संवादिका धनश्री प्रधान दामले उपस्थित राहणार आहेत. 2009 पासून निवेदन क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री दामले यांनी अनेक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
* कॅप्टन योगेंद्र सिंह यादव (परमवीर चक्र)
कारगिल युद्धातील ‘टायगर हिल’चे हिरो… भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण सैनिक.
* पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता)
गावरान देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या कृषी क्षेत्रातील प्रेरणादायी नामवंत व्यक्ती.
* अशोक रोकडे (व्हाईट आर्मी)
आपत्ती व्यवस्थापनात अग्रणी भूमिका बजावणारे, समाजसेवेचे नवे मॉडेल उभे करणारे कार्यकर्ते.
* ज्योती गवते (आंतरराष्ट्रीय धावपटू)
परभणीची भूमीकन्या… राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपट्टीवर पराक्रम साकारणारे व्यक्तिमत्व.
* सुमित वाघमारे (हिंगोली – कलगाव, बर्डमॅन)
200 पेक्षा अधिक पक्ष्यांचे आवाज काढण्याचे कौशल्य… ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना मार्गदर्शन करणारे तरुण नैसर्गिक अभ्यासक.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि तरुणाईला दिशादर्शक ठरणार आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे अनुभव, संघर्ष आणि जीवनमूल्ये मुलाखतीच्या मनोरंजक शैलीत मांडले जाणार असल्याने तरुणाईला ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेध फाउंडेशनचे सर्व सदस्य मनापासून परिश्रम घेत असून परभणीकरांना एका वेगळ्या अनुभवाची मेजवानी मिळणार आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis