
तपोवन मधील वृक्षांची पाहणी करून नागरिकांशी साधला संवाद
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.): आगामी कुंभमेळ्यानिमित्त देश- विदेशातील साधू- महंत येथे येतील. त्यांच्यासाठी साधूग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील. ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे ते अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येतील. तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल, अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
महानगरपालिकेने साधूग्रामच्या जागेवरील वृक्ष हटविण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. महाजन यांनी आज सकाळी तपोवन परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, माजी आमदार बाळासाहेब सानप आदींसह महानगरपालिकेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, राज्य शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. साधूग्रामच्य जागेतील जुन्या वृक्षांना कोणताही धोका नाही. मागील आराखड्या प्रमाणे आताही कार्यवाही केली जाईल. ते करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच फाशीचा डोंगर, पेठ रोड परिसरात नव्याने रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाईल. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना केल्या जातील. साधूग्राम संपादित जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. तसेच नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.
नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यिाच्या कामाला गती देत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. आगामी काळात रस्ते व्हाइट टॅपिंग, सिमेंटचे करण्यावर भर राहील. त्यामुळे रस्ते कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्रीमती खत्री यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV