
सोलापूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य शासनाचा महत्त्व प्रकल्प असलेला नागपूर-गोवा द्रुतगती या शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असून, वाढत्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सोलापूर जिल्ह्यात भूसंपादन तूर्त लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
स्थानिक संस्थेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भूसंपादनास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा महामार्ग राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार प्रमुख विभागांना जोडणार आहे. नागपूर-गोवा एक्स्प्रेसवे लांबी अंदाजे 802 ते 805 किलोमीटर असून, पवनार (वर्धा), पात्रादेवी (सिंधुदुर्ग जिल्हा गोवा सीमेजवळ) येथे जोडणार आहे. सहा पदरी महामार्ग असून, नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 8-10 तासांपर्यंत कमी होणार आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध होत असल्यामुळे यातील काही गावे वगळून महामार्ग तयार करता येईल का, याबाबत विचार सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड