
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ’आविष्कार-२०२५’ राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाच्या ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याची मुदत ५ डिसेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्यात विद्यापीठ स्तरावर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी म्हणून शैक्षणिक वर्ष २००६-०७ पासून राज्यस्तरीय संशोधन महोत्सव ’आविष्कार’ ची सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील संशोधन घटकाला चालना देण्यासाठी, राज्यस्तरीय ’आविष्कार-२०२५’ या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी मा. प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात ’संशोधन’ हा एक अविभाज्य घटक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे डॅाक्टर आणि संशोधक आहेत, ज्यांच्या हाती समाजाच्या आरोग्याची जबाबदारी असेल.
ते पुढे म्हणाले की, ’आविष्कार २०२५’ हा केवळ एक वार्षिक कार्यक्रम नाही, तर वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य निश्चित करणारा एक महत्वपूर्ण मंच आहे. आविष्कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन मूल्ये रुजवली जातात. सखोल संशोधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि प्रभावी विश्लेषणात्मक व संवाद कौशल्ये विकसित होतात. ही कौशल्ये आज जागतिक स्तरावर अत्यंत फायदेशीर ठरतील पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी मोठया संख्येने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रकल्प सादर करावेत. या महोत्सवात सादर होणारे संशोधन हे भविष्यात आरोग्यसेवेत मोठे परिवर्तन घडवून आणेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीस चालना देणे आवश्यक आहे. संशोधनामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या नवीन क्षेत्राचे आकलन होते, तसेच समाजामध्ये असलेल्या विविध समस्यांवर उपाय शोधण्यास ते सक्षम बनतात. ’आविष्कार २०२५’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्याचा आणि विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास होईल.
स्पर्धेसाठी सहा विषय प्रकार
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. पदवी विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संशोधन प्रकल्प खालीलप्रमाणे सहा विषयांमध्ये सादर करता येतील.
१. कला, भाषा आणि ललित कला
२. वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, श्रेणी
३. शुद्ध विज्ञान, श्रेणी
४. कृषी आणि पशुसंवर्धन, श्रेणी
५. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, श्रेणी
६. वैद्यकशास्त्र आणि फार्मसी
प्रत्येक सहभागीला २०० शब्दांत संशोधन सारांश/शोधनिबंध/प्रकल्प सादर करावा लागेल, ज्यात प्रकल्पाचे उद्देश (Aim), उद्दिष्टये (Objectives), गृहितक (Hypothesis), साहित्य व पध्दती (Materials & Methods), निकाल (Result) आणि निष्कर्ष (Conclusion) या बाबींचा समावेश असावा.
स्पर्धेच्या वेळी, सहभागीने १ मीटर X १ मीटर पलेक्सवर तयार केलेला पोस्टर किंवा कार्यरत/स्थिर मॅाडेल सादर करणे आवश्यक आहे. पोस्टर किंवा सादरीकरणावर महाविद्यालयाचे, विभागाचे किंवा विद्यार्थ्यांचे नाव उघड करु नये. एका प्रकल्पासाठी एकाच संशोधकाला सादरीकरणाची परवानगी आहे.
प्रवेशिका सादर करण्यासाठी ऑनलाइन लिंकः https://automation-muhs-ac-in/, प्रवेशिका सादर करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास, कार्यालयीन वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधावा. भ्र.क्र.: ८०८७९९५८८३ किंवा ९९६०६९७८८३ ई-मेलःmuhs-application-helpdesk@gmail-com या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी