
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. दाखल झालेल्या अर्जांपैकी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून एकूण १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी ७ आणि नगरसेवक पदासाठी ११०, असे एकूण ११७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
शिवसेना (शिंदे गट), भाजप युतीतर्फे उमेदवार निश्चित झाले असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र युतीमध्ये राष्ट्रवादीला स्थान मिळाल्याने त्यांनी गुरुवारी आपला अर्ज मागे घेतला.
महाविकास आघाडीकडून राजू देवळेकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) व रमेशभाई कदम (शरद पवार राष्ट्रवादी) यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसकडून सुधीर शिंदे, तर अपक्ष म्हणून लियाकत शहा रिंगणात आहेत. तसेच माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोसले यांचीही उमेदवारी कायम आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे हे अर्ज मागे घेण्यासाठी नियोजित ३ वाजेची मुदत संपून ३.४५ वाजता निवडणूक कार्यालयात पोहोचले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुदत संपल्याचे सांगत त्यांचा अर्ज न स्वीकारल्याने याबाबत शहरात चर्चा रंगली आहे, त्यांना मुदत माहित नव्हती की जाणूनबुजून ते उशिरा पोहोचले, यावर विविध तर्क वितर्क सुरू आहेत.
निवडणुकीसाठी चिन्हवाटप बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी