
तब्बल ६ अपक्षांमुळे निवडणुकीत वाढली रंगत
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।माथेरान नगरपरिषद निवडणुकीत यंदा प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. थेट नगराध्यक्ष पदासह एकूण ४८ उमेदवार रिंगणात उतरले असून, यात ६ अपक्ष उमेदवारांचा समावेश असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट लढत रंगणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला असून, शिवसेनेने देखील या निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांनी जनसंपर्क मोहीम वाढवली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने, विकासाचा रोडमॅप आणि स्थानिक प्रश्न सोडविण्याची हमी दिली जात आहे. अपक्ष उमेदवारांनीदेखील प्रचारात जोर लावला असून, स्थानिक पातळीवरील मतदारसंघातील मुद्दे मांडत स्वतंत्र आवाज बुलंद केला आहे.माथेरानसारख्या छोट्या पण पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या शहरात थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. या निवडणुकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटन व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन हे प्रमुख मुद्दे आहेत. स्थानिक मतदार या प्रश्नांवर विशेष लक्ष ठेवून आहेत आणि विकासाला चालना देणारा सक्षम नगराध्यक्ष अपेक्षित असल्याचे मतदार सांगत आहेत.रिंगणात ४८ उमेदवार असल्याने प्रत्येक प्रभागात बहुकोनी लढती दिसत आहेत. मतदारांच्या पसंतीनुसार मतदानाची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, निकालापर्यंत थरार कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.एकूणच, उत्सुकता, स्पर्धा आणि स्थानिक प्रश्नांची धग अशा वातावरणात माथेरानची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके