
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अमरावती महानगर पालिका निवडणुकीसाठी मनपाच्या निवडणूक विभागाद्वारे प्रारूप मतदार यादीची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार यंदा शहराच्या २२ प्रभागांमधून ६ लाख ७७ हजार १६७ मतदार मतदान करणार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३९ हजार १६७, महिला मतदारांची संख्या ३ लाख ३७ हजार ९३२ व इतर मतदारांची संख्या ६८ आहे. प्रारूप मतदार यादीनुसार सर्वाधिक ४० हजार ५९ मतदार हे प्रभाग क्र. २० सुतगिरणी-सामरानगर तर सर्वात कमी १९ हजार ७४ मतदार हे एसआरपीएफ-वडाळी प्रभागात आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अधिसुचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपासूनच हरकती व सूचना मागवण्याची मुदत सुरू झाली असून अंतिम मुदत ही २७ नोव्हेंबर आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ही ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.तर 12 डिसेंम्बर रोजी मतदार केंद्रानिहाय यादी प्रसिद्ध होईल.
यंदा १ लाख ६४ हजार मतदार
२०१७ मध्ये झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत ५ लाख १२ हजार ६४८ मतदार मनपा क्षेत्रात होते. तर यंदा प्रारूप मतदार यादीनुसार मतदारांची संख्या ही ६ लाख ७७ हजार १६७ पर्यंत वाढली आहे. यंदा १ लाख ६४ हजार ५१९ मतदार वाढले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी