
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस अगदी २४ तासांवर आला असताना गुरुवारी जिल्ह्यात २८ जणांनी माघार घेतली. यामध्ये नगराध्यक्षांच्या ६ आणि नगरसेवकपदाच्या २२ उमेदवारांचा समावेश आहे. बुधवारच्या पहिल्या दिवशी माघार घेणाऱ्यांची संख्या ७ होती.त्यामुळे आतापर्यंत माघार घेणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या ३५ वर पोचली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या ८ अर्जाचा समावेश असून नगरसेवक पदाच्या २७अर्जाचा समावेश आहे.
नगरपालिका प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मोर्शीतील तीन, नांदगाव खंडेश्वर येथील दोन आणि अंजनगाव सुर्जी येथील एकाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.त्याचवेळी अचलपूर येथील सर्वाधिक ५, अंजनगाव सुर्जी व चिखलदरा येथील प्रत्येकी ४, मोर्शीतील ३, धामणगावच्या दोन आणि चांदूर बाजार, दर्यापूर येथील प्रत्येकी एका उमेदवाराने नगरसेवक पदाच्या रिंगणातून स्वतःला बाहेर केले. उद्या, शुक्रवारी हा शेवटचा दिवस असल्याने मोठी संख्या पुढे येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी