
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
चिखलदरा नगरपरिषदेतून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. “चिखलदरा परिसर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना चांगला परिचित आहे. त्यांनी या प्रदेशाला वारंवार भेट देत विकासकामांना गती दिली आहे. त्यामुळे जनतेला खात्री होती की त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेसोबत राहिल्यास चिखलदऱ्याचाही सर्वांगीण विकास जलदगतीने होईल,” असे कलोती यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवारदेखील आपापले अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. “हा एक सामूहिक आणि अभिनव निर्णय आहे. विरोधात उभे असलेले सर्व उमेदवार एकमताने मागे हटले आणि मला बिनविरोध निवडून दिले. हा निर्णय चिखलदऱ्याची विकासाभिमुख भूमिका संपूर्ण महाराष्ट्रासमोर अधोरेखित करणारा आहे,” असे कलोती म्हणाले.चिखलदऱ्यातील जनता विकासाला प्राधान्य देते आणि ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासकेंद्रित धोरणाशी सहमत असल्याचा संदेश या निकालातून स्पष्ट होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील काळात चिखलदऱ्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी