
अकोला, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषद विशेष ठरत आहे. दशकांपासून नगरपरिषद दर्जासाठी सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला यंदा यश मिळाले असून, ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेपर्यंतचा प्रवास करणारी सध्याच्या राज्यातील निवडणुकीतील ही एक मात्र नगरपरिषद आहे आणि पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा महिलेकडे सोपवण्यात आली आहे.
नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी येथे मोर्चेबांधणी गतीने सुरू केली आहे. भाजपने अनुभवी राजकारणी आणि जिल्हा परिषद सदस्या सुलभा दुतोंडे यांच्या नावावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन भाजपने मतदारांना दिले आहे.
हिवरखेड नगरपरिषद क्षेत्रात सुमारे २०,१७३ मतदार असून अध्यक्षपदासाठी तब्बल ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी अल्प मतांच्या फरकाने कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांनी बूथ पातळीवर शक्तीझोत लावण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, या नगरपरिषद निवडणुकीत आणखी एक राजकीय घडामोड चर्चेत आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक पातळीवर दिलेला पाठिंबा ही अभूतपूर्व युती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यात दोन्ही पक्षांमध्ये कडवट भूमिका दिसत असतानाच, हिवरखेडमध्ये मात्र एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिल्यांदा नगरपरिषदेचा दर्जा मिळालेल्या हिवरखेडमध्ये होत असलेली ही निवडणूक त्यामुळे राजकीय दृष्ट्या अधिक रंगतदार बनली असून, अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे