अमरावती : टीईटी परीक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) परीक्षा-2025 ही दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होण
TET परीक्षेसाठी अमरावती पोलिसांचा कडक बंदोबस्त; परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू


अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) परीक्षा-2025 ही दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत या परीक्षेसाठी गाडगे नगर, कोतवाली, राजापेठ, बडनेरा, नागपुरी गेट, नांदगाव पेठ आणि फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 35 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अमरावती पोलिसांनी धारा 163 (भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही नागरिकांची अनावश्यक वर्दळ, जमाव, वाहनांची गर्दी तसेच शांतता भंग होईल अशा हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ परीक्षार्थी, परीक्षा संबंधी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी आणि शासनमान्य व्यक्तींनाच या परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.

परीक्षा केंद्राजवळ टेलिफोन बूथ, झेरॉक्स केंद्र, संगणक सेवा केंद्रे, खाद्य स्टॉल, फेरीवाले यांना परीक्षा संपेपर्यंत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या वैयक्तिक वाहनांना मात्र सूट दिली आहे.सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी सर्व नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande