
चंद्रपूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागासह मेरा युवा भारत, युवा कार्यकम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त 'युनिटी मार्च' पदयात्रा मोठ्या थाटात पार पडली.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या प्रगतीसाठी, स्थैर्यासाठी, सामर्थ्यासाठी एकात्म आणि एकात्मिक भारत किती महत्त्वाचा आहे हे जनमानसावर सातत्याने ठसविले. भारतीय स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी नेहमीच भर दिला. वल्लभभाई पटेल यांचे देश एकसंध राखण्यात व आजच्या भारताच्या निर्मितीत खूप मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व.राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रासेयो जिल्हा समन्वयक गुरुदास बलकी यांनी करतांना सुमारे ५६५ संस्थानांचे वर्चस्व भारतीय राजकारणात त्यावेळी होते. परंतु त्या सर्व संस्थानांना अत्यंत कौशल्याने, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर एकत्र आणण्याचे महान कार्य सरदार पटेल यांच्या हातून घडले आणि आजचा अखंड भारत साकार झाला असल्याचे सांगितले.
यावेळी मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सुशील भड,क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चंद्रदेव खैरवार, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ सतिश कन्नाके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ कुलदीप आर गोंड, डॉ पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादर, डॉ. उषा खंडाळे, क्रीडा विभागाच्या डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा विक्की पेटकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेला सुरुवात प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी हिरवी झेंडे दाखवून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुशील भड, संचालन डॉ. पुरूषोत्तम माहोरे, तर आभार प्रदर्शन डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले.सदर पदयात्रा सकाळी ८.३० वाजता सरदार पटेल महाविद्यालय येथून सुरू होऊन श्रीराम चौक - संताजी सभागृह - पटेल हायस्कुल - गिरनार चौक - गांधी चौक - आंबेडकर पुतळा- कस्तुरबा रोड - गंजवार्ड - सरदार पटेल महाविद्याल येथे पदयात्रेचा समारोप झाला.दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
--------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव