कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नांदेडमध्ये ‘पुरुष नसबंदी पंधरवड्या’चे आयोजन
नांदेड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये ''पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५'' चे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्य
नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,


नांदेड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये 'पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी यांनी सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

पुरुष नसबंदी पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट्य: * कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढवणे. * पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (Vasectomy) एक सुरक्षित, सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे, याबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. * पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करून लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना बळ देणे.*पंधरवड्याचे स्वरूप (२५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५):

पंधरवड्याची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाईल:

* संपर्क व दळणवळण (Contact and Communication) टप्पा: २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५

* या दरम्यान जिल्ह्यापासून ते ग्रामपातळीपर्यंत आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, एएनएम, आशा, व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया आणि कुटुंब नियोजनाच्या साधनांविषयी व्यापक जनजागृती व माहिती प्रसार करण्यात येईल.

* जिल्हा व तालुका स्तरावर व्हीडीओ/ऑडीओ कॉन्फरन्स आयोजित करून कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल.

* स्वयंसेवी संस्था, युवा केंद्र, तरुण मंडळे यांच्या मदतीने जनजागृती सभेचे आयोजन केले जाईल.

* सेवा प्रदायगी (Service Delivery) टप्पा: २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२५

* या कालावधीत आरोग्य संस्थांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध असतील. नोंदणी केलेल्या लाभार्थींना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती व योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

* पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असेल.

* नसबंदी केलेल्या पुरुषांना शासनाच्या नियमानुसार लाभार्थी प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल.

* पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्यानंतर लाभार्थींना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत तपासणीची सेवा देखील उपलब्ध असेल.

डॉ. संगीता देशमुख म्हणाल्या, कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांची नसून, पुरुषांनीही या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. पुरुष नसबंदी एक सोपी व सुरक्षित पद्धत असून, या मोहिमेचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लहान कुटुंबाचा आदर्श स्वीकारावा.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वय राखून, या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय संस्थेची,कार्यालयाशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande