नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी !
* दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्त विसर्जन करावे ! - हिंदु जनजागृती समिती मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - गणेशोत्सव संपून तीन महिने होत आले तरी नवी मुंबई महानगरपालिकेने भाविकांकडून गोळा केलेल्या हजारो श्रीगणेशमूर्तींचे अद्याप विस
निवेदन


* दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्त विसर्जन करावे ! - हिंदु जनजागृती समिती

मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - गणेशोत्सव संपून तीन महिने होत आले तरी नवी मुंबई महानगरपालिकेने भाविकांकडून गोळा केलेल्या हजारो श्रीगणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन केलेले नसल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या मूर्ती पार्किंग वा इतर ठिकाणी धुळ खात पडून राहिल्या असून हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा स्पष्ट अवमान असल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या कडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकारी आणि जबाबदारांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. समितीच्या वतीने दिलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार यांनी स्वीकारले आहे.

समितीने सांगितले की, अशाच प्रकारे राज्यातील विविध महानगरपालिकांच्या हद्दीतही श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार करत, संकलित सर्व मूर्तींचे शास्त्रोक्त पुनर्विसर्जन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी समितीने केली आहे.

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे जिल्ह्यातील डायघर भागातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ शेकडो ट्रकभर गणेशमूर्ती टाकण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. तेव्हा ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर १५० हून अधिक डंपर परताव्यात आले होते. यापूर्वीही पुणे, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये खाडी, नाले, खदानी आणि जुनी विहिरी अशा अयोग्य ठिकाणी मूर्ती टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, श्रीगणेशमूर्तींचे शास्त्रोक्त विसर्जन न होता त्यांचा अपमान होणे हे असह्य आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. पुढील काळात अशा घटना होऊ नयेत, यासाठी विसर्जनानंतर संकलित झालेल्या मूर्तींचे नियोजित पद्धतीने विधीवत विसर्जन केले जावे. तसेच शासनाने हिंदू संघटना, संत, धर्माचार्य यांच्या सल्ल्याने धर्मसंमत व धर्मश्रद्धा जपणारे धोरण ठरवून त्यानुसार अंमलबजावणी करावी. तसेच सध्या ज्या महानगरपालिकांकडे संकलित गणेशमूर्ती आहेत, त्यांचे तातडीने शुद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात यावे आणि हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande