
मुंबई, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, वांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या सहकार्याने ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यामध्ये १०,००० पेक्षा जास्त तरुण मन:शांती, अॅडव्हेंचर, आर्ट्स, कल्चर, संगीत, योग-ध्यान, समाजाभिमुख उपक्रम आणि (स्किल-बिल्डिंग) कौशल्य विकास यांसारख्या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने, हा देशातील आघाडीचा युवक उत्सव ठरणार आहे. आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी हा उत्सव तरुणांची चळवळ म्हणून उभी राहील.
लंडन आणि पुण्यासारख्या शहरानंतर ग्लोबल यूथ फेस्टिव्हल या वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल यूथ कम्युनिटी ही २० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 170 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेली तरुणांची एक प्रेरणादायी चळवळ आहे. क्रिएटर्स, व्यावसायिक, कलाकार, उद्योजक आणि चेंजमेकर यांनी एकत्रित येऊन ग्लोबल यूथ कमिटी तयार केली आहे.
हजारो लोकांना एकत्र आणणारे सायकलथॉनसारखे उपक्रम, ग्रामीण विकासासाठी केलेले अनेक प्रकल्प, आरोग्य, प्राणी-कल्याण, शिक्षण यांसाठी उभारलेले उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ मनोरंजन नसून प्रभाव आणि परिवर्तनाचा उत्सव ठरणार आहे.
संगीत किंवा कला अशा एखाद्या विषयापुरते मर्यादित न राहता, ग्लोबल युथ फेस्टिवल हा समग्र अनुभव देणारा उत्सव आहे. महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, ग्रामीण विकास, प्राणी-कल्याण, पर्यावरण संवर्धन यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचे प्रात्यक्षिक देशातील सर्वात मोठा आऊटडोअर साउंड हीलिंग अनुभव, संगीत, कला, ध्यान, जर्नलिंग, पॉटरी, ड्रम सर्कल अशा मजेशीर पॉप-अप अॅक्टिव्हिटीज यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी youthfestival.srmd.org येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर