
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी बांधव कष्टाने व प्रामाणिकपणे शेती करीत असताना बरेचदा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशावेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शिराळा येथे व्यक्त केला. स्व. विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध प्रतिष्ठान तर्फे शिराळा येथे कृषी मेळावा व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार -2025 वितरण कार्यक्रम कस्तुराबाई जैन विद्यालय प्रांगण, शिराळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार -2025 चे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेती करीत असताना नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कृषी मेळाव्यामध्ये विविध कीडनाशके, फवारणी, अवजारे यांची माहिती देण्यात येत होती. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. वातावरण बदलामुळे बरेचदा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. शासन सक्षमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमरावती जिल्ह्याला 518 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांना सर्व लाभ मिळवून देण्यात येतील. शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनीही जास्तीत -जास्त शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी