
बीड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
भाजप आमदार सुरेश धस यांनी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, बीड येथील कार्यकारी अभियंता यांना आष्टी–पाटोदा–शिरूर (कासार) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच शेतीकामांतील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निवेदन सादर केले.
मागील काही दिवसांपासून या भागातील विविध गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे शेतकरी आणि ऊसतोडणी मजूर रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रब्बी पिकांच्या पाण्याची आवश्यकता, कांदा लागवड आणि उसाच्या कामांमुळे शेतीपंपाचा वापर अनिवार्य असताना महावितरणकडून मिळणारा रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेतील वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले.
या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून, शेतीपंपांना दिवसाच्या वेळेत किमान ८ ते १० तास नियमित व सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना भीतीमुक्त वातावरणात आणि सुरक्षितपणे शेतीकामे करता येतील, अशी मागणीही केली.
याबाबत महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बिबट्या या वर्ग–एक गटातील प्राण्यांच्या दहशतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती निदर्शनास आणून दिली. रात्रपाळीतील वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना जीवाच्या भीतीने शेतीकामे करणे कठीण झाले असून, त्याऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis