
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना समजावण्यात पालकमंत्री उदय सामंत आणि भाजपा निवडणूक प्रभारी ॲड. दीपक पटवर्धन हे दोघेही यशस्वी झाले आहेत. आज भाजपा जिल्हा कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत व ॲड. दीपक पटवर्धन व भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भाजपाच्या ओबीसी प्रमुख प्राजक्ता रुमडे यांच्यासह विभव पटवर्धन, कामना बेग, शुभम साळुंखे आदींनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
या वेळी भाजपाचे ॲड. दीपक पटवर्धन, दादा ढेकणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, नगर परिषदेची निवडणूक महायुती एकत्रित लढवत आहे. या निवडणुकीत काही समज- गैरसमजातून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यासंदर्भात काल संतोष पावरी यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री या नात्याने मी स्वतः आणि ॲड. दीपक पटवर्धन उपस्थित होतो. या बैठकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात प्राजक्ता रुमडे यांना आपण विनंती केली. त्यांनीदेखील सन्मानाने उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. परंतु, शहरात सामाजिक कार्य करत असताना आपल्यालाही सन्मानाचे पद मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार नगर परिषदेमध्ये एकूण तीन स्वीकृत नगरसेवक पदांपैकी भाजपाच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद असल्याने ते प्राजक्ता रुमडे यांना देण्याची भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली असून, आपलादेखील त्याला पाठिंबा असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय आता निश्चित झाला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे भरघोस मतांनी निवडून येतील असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी