
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीची बैठक 6 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सोलापूर कुमार आशीर्वाद, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णासाठी असलेली योजना व त्याची अंमलबजावणीबाबत उपाययोजना करणेबाबत सविस्तर बैठक पार पडली. सदर बैठकीत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेली योजना व सोलापूर जिल्हयातील धर्मादाय रुग्णालयाची यादी नागरिकांना माहिती व्हावी व त्याचा व्यापक प्रसार व्हावा याकरीता जिल्हयातील वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.
उच्च न्यायलय, मुंबई यांचे रिट याचिका (पी.आय.एल.) क्र. 3132/2004 मधील दि.17 ऑगस्ट 2006 व 15 एप्रिल 2009 आदेशाप्रमाणे धर्मादाय रुग्णालयांनी अंमलात आणावयाची योजना
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये ज्यांची सार्वजनिक न्यास म्हणून नोंद झालेली आहे व सदर धर्मादाय न्यास जे धर्मादाय रुग्णालय ज्यामध्ये सुश्रुषालय / प्रसुतीगृह दवाखाना किया वैद्यकीय मदत देणारे केंद्र चालवित आहे व ज्यांचा वार्षिक खर्च हा वैद्यकीय कारणास्तव पाच लाख रुपयापेक्षा जास्त आहे असे न्यास कलम 41 अअ च्या अंतर्गत शासकिय अनुदानित सार्वजनिक न्यास म्हणून समजले जातील. वरील कलम 1 अंतर्गत येणाऱ्या न्यासाबाबत त्यांनी वैद्यकिय केंद्रात कार्यान्चित असलेल्या खाटांच्या संख्येपैकी एकूण 10 टक्के खाटा निर्धन व 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी (एकूण खाटांपैकी 20 टक्के खाटा) आरक्षित ठेवल्या जाऊन सदर रुग्णाकरीताच राखून ठेवल्या पाहीजेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड