आयमाचा औद्योगिक महाकुंभ भव्य दिव्य करण्याचा आयोजकांचा निर्धार
मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात जागेचे भूमिपूजन नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)तर्फे त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे 28 नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स
आयमाचा औद्योगिक महाकुंभ भव्य दिव्य करण्याचा आयोजकांचा निर्धार


मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात जागेचे भूमिपूजन

नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)तर्फे त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे 28 नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स-25च्या जागेचे भूमिपूजन व डोम उभारणीचा शुभारंभ एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री,अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर आणि दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दीपक चंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंत्रोच्चाराच्या घोषात विधिवत पद्धतीने झाले. यावेळचा औद्योगिक महाकुंभ भव्य दिव्य करण्याचा मानस यावेळी आयोजकांनी बोलून दाखवला.

व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बूब,सरचिटणीस प्रमोद वाघ,बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,आयमा इंडेक्सचे चेअरमन वरूण तलवार,आयपीपी निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,उमेश कोठावदे, योगिता आहेर,हर्षद बेळे,गोविंद झा,मनीष रावल आदी होते.

आयमातर्फे आयोजित औद्योगिक महाकुंभामुळे नाशिकच्या निर्यात तसेच गुंतवणुकीला चालना व उदयोन्मुख उद्योजकांना दिशा मिळेल. त्यांना चांगल्या कल्पना आत्मसात करता येतील, असा विश्वास महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी यावेळी व्यक्त केला.आगामी प्रदर्शन शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करून त्यात भव्यता आणू असा मानसही त्यांनी बोलून दाखवला. नाशिकच्या कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या.उद्योजकांचे शासनाबरोबरचे सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याची गरज आहे. नाशकात गुंतवणूक वाढत आहे हे शुभ संकेतच म्हणावे लागेल. एनएमआरडीएची उद्योग क्षेत्राला सोबत घेऊन काम करण्याची तयारी आहे.मेट्रोपॉलिटन क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यात उद्योजकांनी आपल्या सूचना मांडाव्यात व भरीव योगदान द्यावे,असे एनएमएनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयमा औद्योगिक महाकुंभ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.2005 पासून सुरू झालेल्या आयमाच्या प्रदर्शनास दोन दशके पूर्ण झाले असून दरवेळी नवनव्या संकल्पना त्यात असतात. या वेळचे प्रदर्शनही अत्यंत भव्य दिव्य होईल,असा विश्वास आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी व्यक्त केला.आयमाच्या माध्यमातून नाशिकचा औद्योगिक विकास हे या प्रदर्शनाचे खरे ध्येय असून ते सिद्धीस येणारच असा आत्मविश्वास प्रदर्शनाचे चेअरमन वरूण तलवार यांनी व्यक्त केला. सर्वं स्टॉल्स बूक झाले असून उद्योजकांची वाढती मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त स्टॉल्स उभारण्याचे कामही सुरू झाल्याचे तलवार यांनी पुढे नमूद केले. विविध देशातील प्रतिनिधींची उपस्थिती हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य राहणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

भूमिपूजन सोहळ्यास निमाचे अध्यक्ष आशिष नहार,माजी अध्यक्ष धनंजय बेळे, चेंबरचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे,माजी अध्यक्ष संतोष मंडलेच्या, हेमंत राठी, विक्रम सारडा,शोभना बूब,आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande