
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।पनवेल शहरातील वाढते नागरीकरण, महागाईचा फटका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वाढत्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्णतः माफी द्यावी, अशी ठोस मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोनावणे यांनी सांगितले की, पनवेल महानगर पालिका क्षेत्रात अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. घर घेणे सामान्य नागरिकांसाठी आधीच कठीण झाले आहे. ज्यांनी घर घेतले आहे, त्यांना गृहकर्जाचा वाढता ईएमआय, महावितरणचे वाढीव वीजबिल, इमारतीचा मेंटेनन्स चार्ज अशा विविध खर्चांचा मोठा बोजा सहन करावा लागत आहे. त्यातच दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा आवश्यक खर्चांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मालमत्ता कराचा भार सामान्य नागरिकांवर अधिकच वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोनावणे यांनी नमूद केले की, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पनवेल महानगरपालिकेने सामाजिक बांधिलकी जपून ५०० चौरस फूटापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता करात सूट देणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक ओझे कमी होईल आणि त्यांना दिलासा मिळेल.पनवेल महानगरपालिकेने या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रिपाईतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके