
परभणी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या कापूस खरेदी हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्या हस्ते अधिकृत खरेदीला सुरुवात झाली. यावेळी संचालक मंडळ, जिनिंग–प्रेसिंग युनिटचे मालक, व्यापारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनावेळी संचालक संग्राम जामकर, मुंजाजी जवंजाळ, रावसाहेब रेंगे, गंगाप्रसाद आनेराव, विनोद लोहगावकर, घनशाम कनके, रमेश देशमुख, सोपान मोरे, फैजूलखान पठाण तसेच सचिव संजय तळणीकर यांची उपस्थिती होती.
पहिल्याच दिवशी बाजार समितीत कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मध्यम प्रतीच्या तसेच परतवारी केलेल्या कापसास तब्बल ₹7,251 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला, ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली.
संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी व पारदर्शक व्यवहारासाठी कटिबद्ध असल्याचे उद्घाटनप्रसंगी सांगण्यात आले. नवीन हंगामातील खरेदीला सुरुवात झाल्याने बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे व्यापारी व शेतकरी यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
सभापती पंढरीनाथ घुले म्हणाले की, “व्यापारी– शेतकरी– बाजार समिती यांचा समन्वय राखत कापूस व्यापार अधिक सक्षम व नियमानुसार पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis