
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड- पुणे एक्स्प्रेससह हरंगुळ (लातूर) - पुणे स्पेशल यांसारख्या मराठवाड्यातून येणाऱ्या महत्त्वाच्या अनेक गाड्या २६ जानेवारीपासून पुणे जंक्शनऐवजी हडपसरपर्यंतच धावणार आहेत. पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरूनच या गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवसह बार्शी तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसाय होणार आहे. मराठवाडामार्गे पुण्यात येणाऱ्या बहुतेक सर्वच गाड्या हडपसरपर्यंतच मर्यादित करण्यात आल्या आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड- पुणे डेली एक्स्प्रेस हडपसरहून पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुणे विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार, रेल्वे बोर्डाने पुन्हा हा निर्णय मागे घेतला असून, गाडी हडपसरवरच थांबवण्याचा मार्ग निवडला आहे. प्रवासी संघटनांनी खासदार, आमदारांना निवेदन देऊन हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रवासी आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, अमरावती- पुणे गाडीला वगळता महाराष्ट्रातून खासकरून पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड